मुंबई -दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत गोलंदाजांना नामोहरण केल्यानंतर, रोहितने आणखी एक पराक्रम केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी फलंदाजांमध्ये रोहितने १० वे स्थान काबीज केले.
हेही वाचा -अभिषेक नायर क्रिकेटमधून निवृत्त, मुंबईसाठी खेळले होते ९९ सामने
हिटमॅनने या मालिकेत विक्रमी कामगिरी करत ७२२ गुण मिळवले आहेत. तर, अजिंक्य रहाणेही ७५१ गुणांसह पाचवे स्थान राखले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आपले दुसरे स्थान राखून आहे. कसोटीत स्थान मिळालेल्या रोहितने आपला फॉर्म कायम राखत रांची कसोटीत द्विशतक झळकावले आणि अनेक दिग्गजांचे विक्रम मोडित काढले.
रोहितने २५५ चेंडूंचा सामना करत २१२ धावा केल्या, त्यामध्ये २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रोहित हा दुहेरी शतक झळकावणारा भारताचा २४ वा फलंदाज ठरला आहे. या मालिकेत रोहितने आतापर्यंत ४ डावात १३२.२५ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक आणि टी -२० मध्ये शतक ठोकणारा रोहित हा भारताचा एकमेव फलंदाज आहे.