नवी दिल्ली -भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने निवड समितीच्या शिफारशीस मान्यता दिली असून देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.
गेल्या चार वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या आधारावर हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, शाल याव्यतिरिक्त खेळाडूला 7.50 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.तर, यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटपटू इशांत शर्मा, दीप्ती शर्मा, धावपटू द्युती चंद, नेमबाज मनू भाकेरसह २७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या १२ सदस्यीय निवड समितीने ही शिफारस केली होती.