नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा फलंदाजी आणि कमाई करण्यात 'फुल्ल फॉर्मा'त आहे. २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहितने दमदार प्रदर्शन केले. त्यानंतर त्याला याच कामगिरीच्या जोरावर कसोटीत सलामीला येण्याची संधी मिळाली. तेव्हा रोहितनेही दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत आक्रमक खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. याच भन्नाट फॉर्ममुळे रोहितची कॉर्पोरेटमध्ये ओळख 'सुपर रोहित' अशी बनली आहे.
सद्यस्थितीत रोहित जवळपास २० हून अधिक उत्पादनांचा ब्रॅड अँबेसिडर आहे. यात सीएट टायर्स, एडिडास, हब्लोट वॉचेज, रेलिस्प्रे, रसना, शार्प इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्रीम ११ सारख्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातीत रोहित काम करतो. यातून रोहितला होणाऱ्या आर्थिक लाभाची नेमकी आकडेवारी समजू शकली नाही. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, वर्षाकाठी रोहितच्या कमाईत तब्बल ७५ कोटींपेक्षा जास्त रकमेची वाढ होऊ शकते.