मुंबई - भारतीय संघाने रोड सेफ्टी विश्व सिरीजमध्ये लागोपाठ दुसरा विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. श्रीलंका लिजेंड्स संघाने २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या होत्या. इंडिया लिजेंड्सने हे लक्ष्य १८.४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. इरफान पठाणने नाबाद ५७ धावांची खेळी केली.
इंडिया लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्रीलंका लिजेंड्स संघाने २० षटकात ८ बाद १३८ धावा केल्या. तिलकरत्ने दिलशान आणि रमेश कालूवितरणा या सलामीवीर जोडीने ७.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. दिलशान बाद झाल्यानंतर श्रीलंका लिजेंड्सची मधली फळी अपयशी ठरली. अखेर चमारा कप्पुगेदरा (२३), सेनानाईके (१९) आणि रंगना हेरथ (१२) यांच्या खेळीने श्रीलंका लिजेंड्सना १३८ धावांची मजल मारता आली. मुनाफ पटेलने इंडिया लिजेंड्स संघाकडून सर्वाधिक ४ गडी बाद केले. जहीर खान, इरफान पठाण, मनप्रीत गोनी, संजय बांगर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
श्रीलंका लिजेंड्सने दिलेले १३९ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या इंडिया लिजेंड्स संघाची सुरुवात खराब झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला. त्याला चमिंडा वासने बाद केले. सचिन पाठोपाठ सेहवाग धावबाद झाला. त्यानंतर युवराज वासचा बळी ठरला. यामुळे इंडिया लिजेंड्स संघाची अवस्था ४.२ षटकात ३ बाद १९ अशी झाली होती. तेव्हा मोहम्मद कैफ आणि संजय बांगर यांनी संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. बांगरचा (१८) अडथळा हेरथने काढला.