रायपूर - भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो भारतीय लेजंड्स संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणी दरम्यान, सचिनने मेडिकल अधिकाऱ्यावर प्रॅक केला.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये मंगळवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्याआधी खेळाडूंची चाचणी करण्यात आली. मेडिकल अधिकाऱ्याने सचिनचा स्वॅब सँपल घेतला. यानंतर सचिनने जोरात ओरडत नाकाला दुखापत झाल्यासारखे भासवले. सचिनचे हे रुप पाहून स्वॅब घेणारा मेडिकल अधिकारी थोडा घाबरला. तेव्हा सचिनने हसायला सुरूवात केली.
दरम्यान, सचिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. 'मी खेळलोय २०० टेस्ट आणि २७७ कोरोना टेस्ट. थोडीशी गंमत म्हणून मी प्रॅक केला. आम्हाला इथे मदत करणाऱ्या मेडिकल स्टाफचे आभार. त्यांच्या मदतीमुळेच आम्ही या स्पर्धेत खेळू शकत आहोत,' असे सचिनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.