मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काल (बुधवार) रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज अखेर उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मावळली. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारतीय क्रिकेट संघाचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, सुरेश रैना, भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री, महिला क्रिकेटपटू मिताली राज, चेतेश्वर पुजारा, हरभजन सिंग, युजवेंद्र चहल, इशांत शर्मा, व्हीव्हीएस लक्ष्मण आदी क्रिकेटपटूंनी ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
सचिन तेंडुलकर -
'ऋषी जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. मी त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो. ते नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहणारी व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या दुःखाच्या काळात नीतू जी, रणबीर आणि कपूर कुटुंबासोबत आहोत.'