चेन्नई - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्याने मोठी हानी झाली. जिल्ह्यातील जोशी मठ येथील बद्रीनाथ मार्गावर ही घटना घडली. या घटनेतील बचावकार्यासाठी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने आपल्या एका सामन्याचे मानधन देऊ केले आहे. पंत भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा सदस्य आहे.
हेही वाचा - तब्बल १३ वर्षे 'अनसोल्ड' राहिलेल्या मुशफिकुरची यंदाच्या आयपीएलमधून माघार
रविवारी सकाळी या शोकांतिकेच्या घटनेनंतर सुमारे दीडशे लोक बेपत्ता आणि ठार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १०हून अधिक लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पंतने लोकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीव गमावलेल्यांच्या कुटूंबासाठी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, आपत्तीत गंभीर जखमी झालेल्यांसाठी ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.