मेलबर्न- रिकी पाँटिंगला ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आणि डॉन ब्रॅडमन खालोखाल सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. एकदा फॉर्ममध्ये आलेल्या पाँटिंगला रोखणे महाकठीणच. त्याच्यासारखा कव्हर ड्राईव्ह आणि पूल शॉट मारणारा दुसरा फलंदाज नाही. या दोन शॉटमुळेच त्याने कुठल्याही पिचवर न अडखळता खोऱ्याने धावा जमवल्या. अशा खेळाडूला त्याच्या करिअरमध्ये एका गोलंदाजाने चांगलेच सतावले.
इंग्लंड क्रिकेटने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अॅशेस मालिकेतील असून रिकी पाँटिग इंग्लंडचा गोलंदाज अँड्र्यू फ्लिंटॉफच्या गोलंदाजीचा सामना करत आहे. या व्हिडिओवर पाँटिंगने कमेंट केली आहे. त्याने, क्लासिक रिव्हर्स स्विंग, ज्याचा वेग ९० मैल प्रति तास (१४० किमी/ता) पेक्षा जास्त होता, असे म्हटले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ २००५ च्या अॅशेस मालिकेतील एजबेस्टन कसोटीचा आहे. यात फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर पाँटिगची पळता भुई झाली होती. फ्लिंटॉफचा रिव्हर्स स्वीग पुढे पाँटिंग हतबल झालेला पाहायला मिळाला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाँटिंग बादही झाला. इंग्लंड क्रिकेटने हा व्हिडिओ शेअर करताना, रोमाचंक थरारासाठी, असे म्हटले आहे.