मेलबर्न -भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर आहे. यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सुनावलं आहे. त्याने, एमसीजीची खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. तर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले, असे म्हटलं आहे.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात ६ गडी बाद १३३ अशी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे २ धावांची आघाडी असून त्यांचे ४ गडी शिल्लक आहेत.
पाँटिंग म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीला दोष देऊ शकत नाहीत. कारण खेळपट्टी एकदम परिपूर्ण होती. चेंडू थोडासा वळत होता. पण तुम्ही हे अगोदरपासून ग्रहित धरलेले असता. कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी केलेले हे प्रदर्शन खराब फलंदाजीचे एक उदाहरण आहे.'
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजाविरोधात समर्थपणे खेळले नाहीत. यामुळे ते खराब शॉटवर बाद झाले. धावफलक हलता ठेवण्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अपयश आले. यामुळे दडपण वाढत गेले. या दडपणामुळे खराब शॉट फलंदाजांनी खेळलं, असे देखील पाँटिंग म्हणाला.