कराची -पुढील महिन्यांत कोरोना व्हायरसची परिस्थिती सुधारल्यास पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) यंदाच्या हंगामातील उर्वरित सामने नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिली आहे. कोरोनामुळे पीसीबीने १७ मार्च रोजी पीएसएलच्या बाद फेरीतील सामन्यांना पुढे ढकलले होते. या लीगचा अंतिम सामना १८ मार्चला होणार होता.
हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू 'आयसोलेशन'मध्ये
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी पीएसएलच्या उर्वरित सामन्यांविषयी माहिती दिली. 'पीएसएलचे उर्वरित सामने नोव्हेंबरच्या दहा दिवसात आयोजित केले जाऊ शकतात. त्यासाठी फ्रँचायझींसोबत बैठक करून आधी आपण यावर चर्चा करावी लागेल', असे खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ८०० घटनांची पुष्टी झाली असून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पीएसएलमध्ये इंग्लंडचा खेळाडू अॅलेक्स हेल्सला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा रंगली होती. यामुळे पीसीबीने सुपर लीमधील खेळाडू, सहायक कर्मचारी, सामनाधिकारी, प्रसारक आणि संघ मालक असे एकूण १२८ जणांची कोरोना चाचणी केली. १२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे पीसीबीने जाहीर केले आहे.