नवी दिल्ली - टीम इंडियाचा फंलदाज अंबाती रायडूने क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रानुसार रायडूने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करण्याचे ठरवले आहे. 'हा निवृत्ती घेण्याचा माझा निर्णय घाईघाईचा होता. केवळ चांगल्या लोकांशी बोलण्यामुळेच मी हा निर्णय परत घेण्यास राजी झालो', असे रायडूने म्हटले आहे.
हेही वाचा -दिनेश कार्तिकला बीसीसीआयची तंबी, केला 'हा' प्रकार
रायडू म्हणाला, 'संकटकाळी माझी साथ देण्यासाठी मी चेन्नई सुपरकिंग्स, वीवीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांना धन्यवाद देतो. माझ्यामध्ये खुप क्रिकेट शिल्लक आहे, याची मला या लोकांनी जाणीव करून दिली. मी येत्या हंगामासाठी हैदराबादच्या संघाकडे लक्ष देणार आहे. १० सप्टेंबरला मी या संघासोबत असेन.'
रायडू पुढे म्हणाला, 'सीएसके व्यवस्थापन, लक्ष्मण, नोएल सतत माझ्याशी बोलत होते, आणि शेवटी मला खात्री वाटली की त्यांनी जे सांगितले ते योग्य आहे. मला वाटले की मी जिथे आहे तेथे पोहोचण्यासाठी २० वर्षे मी काम केले ते का सोडून द्यावे? त्यानंतर मी विचार केला की, कदाचित मी अजूनही खेळू शकतो आणि क्रिकेटला काहीही न देता फक्त पुढे जाणे माझ्यासाठी थोडेसे स्वार्थी ठरेल. मी अजूनही तंदुरुस्त आहे आणि अजूनही खेळू शकतो, म्हणून मला वाटते की कदाचित हा निर्णय थोडा उतावीळपणाचा होता.'
रायडूने ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून आतापर्यंत एकही कसोटी सामना त्याला खेळता आलेला नाही.आयपीएलमध्ये रायडूने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.