ख्राईस्टचर्च -भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि क्रिकेट जगतातीत नामवंत क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाने अफलातून झेल घेत सर्वांना चकित केले. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत डिप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने वर उडी मारत एका हाताने हा झेल टिपला.
हेही वाचा -'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये द्युती चंदला सुवर्ण
या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात २३५ धावा केल्या. यजमान संघाचा तळाचा फलंदाज नील वॅगनर आणि काईल जेमिसनची जोडीने अर्धशतकी भागिदारी रचली. त्यानंतर, मोहम्मद शमीने केलेल्या ७२ व्या षटकाच्या गोलंदाजीवर वॅगनरने एक फटका खेळला. यावेळी अशक्य वाटणारा हा झेल जडेजाने हवेत उडी मारत एका हाताने घेतला. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरल असून जडेजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ख्राईस्टचर्चवर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही भारताने निराशा केली. न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ धावांत रोखल्यानंतर, भारताने फलंदाजीला प्रारंभ केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ६ बाद ९० धावांपर्यत मजल मारली असून त्यांच्याकडे ९७ धावांची आघाडी आहे.