नवी दिल्ली -पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेचे पानिपत केल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी आयसीसी क्रमवारीत 'वरचढ' कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीच्या बळावर अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत १० वे स्थान राखले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीनंतर अश्विनने तीन स्थानांची आघाडी घेतली असून तो आता ७ व्या स्थानी विराजमान झाला आहे.
हेही वाचा -बीसीसीआयवर आजपासून 'दादा'गिरी सुरू.. गांगुलीच्या हाती अध्यक्षपदाची धुरा
दुसरीकडे, कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील अंतिम दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्याने या यादीत नववे स्थान राखले. पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत रहाणेने ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. शिवाय, विराटसोहत त्याने १७८ धावांची भागीदारीही रचली होती.
विराट कोहलीने आफ्रिकेविरुध्दच्या पुण्यातील कसोटी सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली. याचा फायदा विराटला कसोटी क्रमवारीत झाला. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात विराट दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र, त्याने स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर कमी केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या नाबाद २५४ धावांच्या खेळीनंतर, विराटने ३७ गुणांची कमाई करत, गुणांची धावसंख्या ९०० पार केली. दरम्यान, सद्य स्थितीत स्टिव्ह स्मिथ या क्रमवारीत अव्वलस्थानी असून त्याची गुणसंख्या ९३७ इतकी आहे. तर विराटची गुणसंख्या आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ९३६ झाली आहे.