मुंबई - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. कालपासून (ता १ सोमवार) तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. यात जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरिल व्याधीग्रस्त अशा लोकांना लस दिली जात आहे. आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लस घेतली. त्यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
रवी शास्त्री यांनी लस घेतानाचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहल आहे की, 'आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या विषाणूशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्याने जगभरात देशाची मान आणखी उंचावली. या सर्वांचे मी आभार मानतो.'
दरम्यान तिसऱ्या टप्प्यात प्राथमिक माहितीनुसार, 27 कोटी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. जवळपास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागणार आहेत.