ब्लॉमफोनटेन -लंकेविरूद्ध पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय साकारल्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा फक्त ४१ धावांत खुर्दा उडवला आहे. आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत जपानविरूद्ध टीम इंडियाने ही कामगिरी नोंदवली. भारताने या सामन्यात दहा गड्यांनी विजय मिळवला. भारताकडून रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी करत आठ षटकांत पाच धावा देत चार, तर कार्तिक त्यागीने तीन गडी बाद केले. रवी बिश्नोईला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -Australian Open : दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल दुसऱ्या फेरीत
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या जपानला भारताच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासून हादरे दिले. जपानचे पाच फलंदाज शून्यावर, तीन फलंदाज एकवर आणि दोन फलंदाज ७ धावांवर बाद झाले. २२.५ षटकांमध्ये जपानचे सर्व फलंदाज बाद झाले. विशेष म्हणजे, जपानच्या एकूण धावसंख्येमध्ये १९ धावा अवांतर होत्या. बिश्नोई आणि त्यागी व्यतिरिक्त गोलंदाज आकाश सिंगला दोन आणि विद्याधर पाटीलला एक बळी मिळाला आहे.
जपानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने २९ आणि कुमार कुशाग्राने १३ धावा करत हा विजय साकारला.