दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबने हैदराबादचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्यात कुणालाच यश आले नाही. या दरम्यान, पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या विकेटचीच चर्चा होत आहे. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने फेकलेली फिरकी त्याला समजलीच नाही आणि तो त्रिफळाचित झाला.
घडले असे की, पंजाबच्या डावाच्या ११व्या षटकात राशिद खान गोलंदाजीसाठी आला. तेव्हा समोर केएल राहुल २७ धावांवर खेळत होता. राशिदने राहुलला फ्लाइटेड चेंडू फेकला. त्या चेंडूवर राहुलले ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आत वळला आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. राहुलला हा चेंडू समजलाच नाही. काही काळ राहुलला समजू शकले नाही की तो त्रिफळाचित कसा झाला.