नवी दिल्ली -बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग लवकरच '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो 'हरियाणा हरिक्केन' म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवर आधारित हा चित्रपट असून रणवीरने यासंबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून सर्वजण भारावले आहेत.
हेही वाचा -खांद्याला दुखापत असूनही तो लढला..आणि जिंकला
रणवीरने कपिल देव यांच्या प्रसिद्ध 'नटराज शॉट'ची आपली एक झलक शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रणवीर हुबेहुब कपिल देव यांच्यासारखा दिसत असून खुद्द कपिल देव यांनीही त्याच्या या पोस्टचे कौतुक केले आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत पाहून चाहतेही भारावले आहेत.
रणवीरच्या ट्विटला रिट्विट करत 'हॅट्स ऑफ रणवीर', अशा शब्दांत कपिल देव यांनी रणवीरचे कौतुक केले आहे. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका पदुकोण देखील झळकणार आहे. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका ती साकारणार आहे. त्यामुळे रिअल लाईफमधील पती पत्नीची जोडी ऑनस्क्रिन देखील पती पत्नीच्या रुपात दिसणार आहे. रणवीरने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी त्याने त्यांच्या घरी दिल्ली येथे १० दिवस राहून प्रशिक्षण घेतले होते.