नवी दिल्ली - रणजी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रणजीच्या ८५ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यादांच घडलं, प्रथमच एका संघाने फॉलोऑन मिळाल्यानंतर विजय मिळवला. असा कारनामा झारखंड संघाने केला असून त्यांनी त्रिपुराविरुद्ध अविस्मरणीय असा विजय मिळवला.
आगरतळा येथे झारखंड आणि त्रिपुरा संघातील रणजीचा सामना रंगला होता. त्रिपुराने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात २८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झारखंडचा संघ १३६ धावा करू शकला. तर चार दिवसीय रणजी सामन्यात पहिल्या डावात १५० हून अधिक धावांची आघाडी फॉलोऑन मानली जाते.
फॉलोऑनचं ओझं घेऊन मैदानात उतरलेल्या झारखंडची दुसऱ्या डावात सुरुवात खराब झाली. निम्मा संघ माघारी परतला. तेव्हा इशांक जग्गी आणि सौरभ तिवारी यांनी अविस्मरणीय खेळी केली. दोघांनी अनुक्रमे १०७ आणि नाबाद १२२ धावा केल्या. जग्गी आणि सौरभच्या खेळीच्या जोरावर झारखंडने ८ बाद ४१८ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.
त्रिपुराला पहिल्या डावातील आघाडी वजा करून जिंकण्यासाठी २६६ धावांचे लक्ष्य मिळाले. तेव्हा आशिष कुमार यांच्या भेद माऱ्यासमोर त्रिपुराच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. त्रिपुराचा संघ दुसरा डावात २११ धावा करू शकला आणि झारखंडने अविस्मरणीय सामना ५४ धावांनी जिंकला.
दरम्यान, त्रिपुराचा एमबी मुरासिंह याने १०३ धावांची खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. आशिष कुमारने ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
दरम्यान, २०११ मध्ये कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला होता. तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी अविस्मरणीय खेळी केली. दोघांनी अनुक्रमे २८१ आणि १८० धावा केल्या होत्या. लक्ष्मण आणि राहुल यांच्या जोरावर भारताने पराभवाच्या दिशेने जात असलेला सामना १७१ धावांनी जिंकला.
हेही वाचा -Aus vs NZ : भिरकवलेली टोपी पंचांनी हवेत झेलली, पाहा स्मिथ आणि दार यांच्यातील मजेशीर सामना
हेही वाचा -VIDEO : हवेत 'सूर' मारुन स्मिथने घेतला अप्रतिम झेल, फलंदाज चक्रावला