नवी दिल्ली - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिग्गज क्रिकेट प्रशासक राजीव शुक्ला हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होणार आहेत. तसेच, ब्रिजेश पटेल आणि एम. खेरुल जमाल मझुमदार हे सल्लागार होणार आहेत. या तिन्ही पदांसाठी यांनी केलेला अर्ज वैध मानला गेला आहे. शिवाय, या पदांसाठी इतर कोणतेही उमेदवार नाहीत.
हेही वाचा -मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी आयपीएलचे माजी आयुक्त शुक्ला यांचे नाव प्रस्तावित केले. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या तीन रिक्त पदांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, कोणतीच स्पर्धा नसल्याने निवडणूक अधिकारी अचल कुमार जोटी यांना फक्त या तिघांच्या नावांची घोषणा करायची आहे. उमेदवारांची नावे मागे घेण्याची मुदत शनिवारपर्यंतची आहे.
माहीम वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त होते. ते आता उत्तराखंडमध्ये गेले आहेत. तेथे त्यांची राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव म्हणून निवड झाली. २०१७ सालपर्यंत राजीव शुक्ला उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेत सचिव पदावर काम करत होते. यानंतर २०१८ साली त्यांनी आयपीएलचे अध्यक्ष म्हणून काम केले.