आबुधाबी -चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने अखेरच्या काही षटकात बाजी पलटवत विजय मिळवला. कारण शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू ही जोडी मैदानात असताना, एका क्षणाला चेन्नई सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण ते बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली आणि कोलकाताने हा सामना १० धावांनी जिंकला. कोलकाताच्या या विजयात सलामीवीर राहुल त्रिपाठीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे त्याला समानावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राहुलने पहिल्यांदा सलामीला येत एक बाजू पकडून ५१ चेंडूत ८१ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ३ षटकाराचा समावेश आहे. राहुल वगळता कोलकाताचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताला १६७ धावा करता आल्या. राहुलला या खेळीनंतर सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना केकेआरचा सहमालक शाहरुख खाननेही राहुल त्रिपाठीच्या खेळीचे कौतुक केले. राहुल सामनावीरचा पुरस्कार घेतल्यानंतर समालोचक हर्षा भोगलेशी बातचित करत होता. तेव्हा शाहरूखने स्टेडियममधून 'राहुल, नाम तो सुना होगा' हा आपला प्रसिद्ध डायलॉग म्हटला. तेव्हा राहुलची कळी खुलली आणि तो हसू लागला. हर्षा भोगलेनेही शाहरुखला हसून दाद दिली.