बंगळुरू- जगभरात तंत्रशुद्ध फलंदाज अशी ख्याती असलेला भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मुलाने एक मोठा पराक्रम केला आहे. द्रविडचा मुलगा समितने एका एकदिवसीय सामन्यात खेळताना द्विशतक झळकावलं आहे. समितने शालेय क्रिकेट स्पर्धेत हा पराक्रम केला आहे.
समित माल्या अदिती या शाळेकडून १४ वर्षांखालील स्पर्धेत क्रिकेट खेळतो. त्याने श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीविरुद्ध खेळताना द्विशतक झळकावले. समितने ३३ चौकाराच्या जोरावर २०४ धावांची खेळी साकारली. समितच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या आदिती शाळेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल प्रतिस्पर्धी श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीच्या संघ ११० धावांमध्ये आटोपला. अदिती शाळेने हा सामना २६७ धावांनी जिंकला.
मागील दोन महिन्यात समितने ५ सामन्यात खेळताना ६८१ धावा केल्या आहेत. यात दोन द्विशतक, एक शतक आणि एक अर्धशतकाचा सामावेश आहे. याशिवाय समितने ७ गडी टिपले आहेत.
समितचे १४ वर्षांखालील स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. याआधी त्याने २०१९ च्या अखेरीस झोनल स्पर्धेत खेळताना २०१ धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, त्या सामन्यात समितने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली त्याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखवला होता.