नवी दिल्ली - राहुल द्रविडला भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा भारताने मोठे विजय साकारले आहेत. एकदिवसीय, कसोटी अशा सर्व स्वरूपात तो 'समस्यानिवारक' म्हणून ओळखला जायचा. मात्र, द्रविडलाही समस्या असायच्या. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटर डब्ल्यू.व्ही. रमण यांच्या कार्यक्रमात द्रविडने कारकिर्दीतील आव्हानात्मक टप्प्याबद्दल चर्चा केली.
द्रविड म्हणाला, ''माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले, जेव्हा मला असुरक्षितता वाटली. 1998 मध्ये मला एकदिवसीय क्रिकेटमधून वगळण्यात आले. त्यावेळी परत येण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर मी एक वर्ष क्रिकेटमधून बाहेर होतो. मग माझ्यामध्ये नक्कीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. मी खरोखर एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास पात्र आहे का, हा प्रश्न माझ्या मनात आला होता.''
तो पुढे म्हणाला, ''मला कसोटीपटूच व्हायचे होते. माझे प्रशिक्षण एक कसोटीपटू म्हणूनच झाले. फक्त ग्राउंड शॉट्स खेळायचे हे आम्हाला शिकवले होते. जेव्हा आम्ही लहान वयात क्रिकेट खेळत होतो, तेव्हा या क्षेत्रात खूप स्पर्धा होती. त्यावेळीही असुरक्षिततेची भावना होतीच. कारण भारतात युवा क्रिकेटपटू होणे सोपे नव्हते. तेव्हा आमच्या युगात फक्त रणजी करंडक होता.''
''त्यावेळी आयपीएल नव्हते आणि रणजी करंडकामध्ये जे मानधन मिळायचे ते फारच कमी असायचे. आव्हानेही गंभीर होती. क्रिकेट निवडल्यानंतर शिक्षण सोडावे लागले. मी अभ्यासातही वाईट नव्हतो. मी एमबीए किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात करियर करू शकलो असतो. पण मी क्रिकेटमध्ये प्रगती केली'', असे 24,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या द्रविडने सांगितले.
1998 नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्रविडने पुनरागमन केले. तेव्हा त्याने भारतीय संघात विश्वासार्ह फलंदाज म्हणून आपले स्थान निश्चित केले. 1999 च्या विश्वकरंडक स्पर्धेत द्रविडने चांगली कामगिरी केली होती. क्रिकेटच्या दोन्ही स्वरूपामध्ये त्याने उत्तम कामगिरीचा दाखला देत 'मिस्टर डिपेंडेबल' आणि 'वॉल ऑफ इंडिया' हे बिरूद पदरी पाडले.