दुबई - आयपीएल २०२० ला सुरूवात होण्याआधी मागील हंगामात रविचंद्रन अश्विनने केलेल्या मंकडींगची चर्चा रंगली होती. यावर दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने अश्विनला यंदा मंकडींग करण्याची परवानगी देणार नाही, असे सांगितले होते. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात अश्विनला पुन्हा एकदा मंकडींग करण्याची संधी चालून आली होती. पण त्याने आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनेचे पालन करत खेळाडूला मंकडींग न करता, खेळाडूला क्रिजमध्ये राहण्याची वॉर्निंग दिली.
दुबईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दिल्लीच्या १९६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. सामन्यात तिसरे षटक टाकत असताना अश्विनच्या गोलंदाजीवर नॉन-स्ट्राईक एंडला उभा असलेला अॅरोन फिंच चेंडू टाकण्याआधीच धाव घेण्यासाठी पुढे गेला. यावेळी आश्विनकडे त्याला मंकडींग करण्याची संधी होती. पण त्याने मंकडींग न करता फिंचला ताकीद दिली. हे पाहून डगआऊटमध्ये बसलेला रिकी पाँटिंगलाही हसू आले.