जोहान्सबर्ग - यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकची २०२०-२१ हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने (सीएसए) ही माहिती दिली. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत डी कॉक संघाचे नेतृत्व करणार आहेत.
हेही वाचा -खुशखबर!...रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास
सीएसए संयोजक व्हिक्टर पिट्सेंग यांना डी कॉकच्या क्षमतेबद्दल विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, "आम्ही संघात सातत्य राखले आहे. राष्ट्रीय निवड समिती म्हणून आम्हाला त्याचे समाधान आहे. डी कॉक पुढील हंगामापर्यंत ही जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे. कर्णधार म्हणून आम्ही त्याचे पूर्ण समर्थन करतो."
सीएसएने श्रीलंकेसमवेत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही संघाची घोषणा केली आहे. हे दोन सामने बॉक्सिंग डे आणि नवीन वर्षात खेळले जातील. हे सामने कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असतील. सारेल इर्वी, ग्लेन्टन स्ट्रूमॅन आणि काइल व्हेरियेन यांना संघात स्थान मिळाले आहे. वियान मल्डर दुखापतीतून परतला आहे. कगिसो रबाडा आणि ड्वेन प्रेटोरियस यांचे संघात नाव नाही. परंतु त्यांच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे.
संघ : क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेंबा बावुमा, एडिन मार्क्राम, फाफ डू प्लेसिस, ब्युरन हेंड्रिक्स, डीन एल्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रासी व्हॅन डर डुसेन, सारेल इर्वी, व्हेरियेन नॉर्किया, ग्लेन्टन स्ट्रूमॅन, वियान मल्डर, कीगन पीटरसन , काइल व्हेरिएन.