हैदराबाद - ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर चेतेश्वर पुजारा सरावा दरम्यान जखमी झाला आहे.
सराव करताना पुजाराच्या उजव्या हातावर चेंडू आदळला. त्यानंतर त्याने तत्काळ मैदान सोडून जाणे पसंत केले. 32 वर्षीय चेतेश्वर पुजारा टीमचा एक मुख्य खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियामधील एका पत्रकाराने नेट प्रॅक्टिसचा फोटो शेअर करत सांगितले, की फलंदाजीचा सराव करताना चेतेश्वर पुजारा हातावर जोरदार चेंडू आदळल्याने जखमी झाला आहे. फोटोत दिसत आहे, की दुखापतीनंतर फिजिओ पुजाराजवळ असल्याचे दिसत आहे. दरम्यान काही वेळ आराम केल्यानंतर पुजारा पुन्हा मैदानात परतला व त्याने सरावात भाग घेतला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत पुजारा काही खास प्रदर्शन करू शकलेला नाही. चार डावात पुजाराने 15.75 च्या स्ट्राईक रेटने केवळ ६३ धावा केल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.