जयपूर - सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याचे नाबाद (१०५) शतक आणि सूर्यकुमार यादवच्या (५०) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्ली संघाचा विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एलिट ग्रुप-डीमध्ये सात गडी राखून पराभव केला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. हिम्मत सिंह याने १४५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकात सात बाद २११ धावा धावफलकावर लावल्या. यात शिवांकने ५५ तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३९ धावांचे योगदान दिले.
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या २१२ धावांचे आव्हान मुंबईने पृथ्वी शॉचे शतक आणि सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज पूर्ण केले. मुंबईने हा सामना ३१.५ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.