नवी दिल्ली - भारताचा उद्योन्मुख युवा खेळाडू पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याचे आठ महिन्यासाठी निलंबन केले आहे. पृथ्वी आता 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये पृथ्वी शॉ याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान, डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत तो दोषी आढळला. यामुळे त्याचे आठ महिन्यासाठी निलंबन करण्यात आले आहे.
डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वी शॉने 16 जुलैला स्पष्टीकरण दिले. माझ्या हातून जाणूनबुजून हे कृत्य घडलेले नाही. तर कफ सिरप घेताना त्यामध्ये उत्तेजक द्रव्य माझ्या शरीरात गेले, असे पृथ्वीने सांगितले. बीसीसीआयने पृथ्वीचे म्हणणे मान्य केले आहे.
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात पृथ्वी शॉचा समावेश नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण तो दुखापतीमुळे बाहेर असल्याचे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाल्यामुळे तो संघाबाहेर होता.
खेळाडूंना डोपिंग चाचणी, प्रशिक्षण शिबिरात अथवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी द्यावी लागते. या चाचणीत खेळाडू दोषी आढळल्यास त्याला स्पर्धेतून बाद ठरवले जाते. दरम्यान, ही चाचणी खेळाडूच्या युरीनचे नमुने तपासून घेतली जाते.
डोपिंगवर का बंदी घालण्यात आली -
उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्यामुळे खेळाडूंच्या स्नायूंची आणि मज्जातंतूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खेळाडूंना थकवा जाणवत नाही. यामुळे निकोप स्पर्धा बघायला मिळत नाही आणि खेळाडूंच्या आरोग्यावरही परिणाम होत असतात. म्हणूनच डोपिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.