दिल्ली - मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात १२२ चेंडूत १६५ धावांची वादळी खेळी केली. पृथ्वीचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे शतक ठरले. यासोबतच शॉने एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवालचा विक्रमही मोडीत काढला.
श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये पृथ्वी मुंबईचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या कर्नाटकविरुद्ध मुंबईला पहिल्यांदा फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. तेव्हा पृथ्वीने आक्रमक खेळ करत कर्नाटकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
मयांकचा मोडला विक्रम...
पृथ्वी शॉ विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मयांकचा विक्रम मोडित काढला. मयांकने विजय हजारे करंडक स्पर्धेच्या २०१७-१८ या हंगामात ७२३ धावा केल्या होत्या. मयांक अग्रवालचा विक्रम तोडताना पृथ्वी शॉने चार शतकासह ७५४ धावा केल्या आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमध्ये पुद्दुचेरीविरोधातील केलेल्या २२७ धावांचाही समावेश आहे.