मुंबई- भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बीसीसीआयने ८ महिन्यासाठी निलंबन केले. शॉचे निलंबन १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये संपुष्टात येईल. दरम्यान, बीसीसीआयच्या कारवाईनंतर पृथ्वी शॉने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
'सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान मला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. तेव्हा मी औषध घेतले. त्या औषधामध्ये बंदी घालण्यात आलेले द्रव्य असल्याचे आढळून आले. मी अप्रत्यक्षपणे बीसीसीआयच्या नियमाने उल्लंघन केले आहे. मला माझी चूक मान्य आहे असून मला यातून धडा मिळाला', असल्याचे पृथ्वी म्हणाला.
ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळताना मला दुखापत झाली. त्यानंतर मी नियमांचे पालन केले नाही. हे मी जाणूनबुझून केले नाही. मला क्रिकेट खेळायचे आहे. एकीकडे मी दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मी निलंबनाच्या कठोर कारवाईत अडकलो आहे. मला खेळाडूंना सांगायचे आहे की, कोणतेही औषध परस्पर डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नका. मी नियमाचे पालन करु इच्छित आहे. मला समजून घेतल्याबद्दल मी बीसीसीआयचे धन्यवाद मानतो. बोर्डाने माझे मत ऐकून घेतले. क्रिकेट हेच माझे आयुष्य असून भारत आणि मुंबईसाठी खेळणे यापेक्षा कोणतीही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाही, असेही पृथ्वी म्हणाला.
पृथ्वी शॉची सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान लघवीचा नमुना घेण्यात आला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०१९ ला त्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचे दिसून आले. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडाने प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला असून यामुळे बीसीसीआयने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई केली.