मुंबई -भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करत पुनरागमन केले. आसामविरुद्ध झालेल्या या सामन्यात पृथ्वीने ७ चौकार आणि २ षटकारांसह ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची झटपट खेळी केली.
हेही वाचा -मैदानात शिवी दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे निलंबन
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा रचल्या. या धावांचा पाठलाग करताना आसामचा संघ १२३ धावांवर आटोपला. डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वीवर बंदीची कारवाई करण्यात आली होती.
शॉने खोकल्याचे औषध घेतले होते. या औषधामध्ये 'टर्बुटेलाइन' हे प्रतिबंधित द्रव्य आढळल्याने आंतरराष्ट्रीय अॅन्टी डोपिंग नियमानुसार त्याच्यावर १५ मार्च २०१९ पासून आठ महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.
पृथ्वीने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. राजकोट येथे झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. पृथ्वी शॉवरील आठ महिन्यांची बंदी येत्या १६ नोव्हेंबरला संपुष्टात आली. यामुळे सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात शॉची निवड निश्चित मानली जात होती.