अहमदाबाद - जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमधील मोटेरा येथे तयार झाले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईत पार पडले. यातील पहिला सामना पाहुण्या संघाने तर दुसरा सामना भारताने जिंकला. उभय संघातील मालिका सद्यघडीला १-१ अशा बरोबरीत आहे. आता तिसरा सामना दिवस-रात्र पद्धतीने अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.
मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमची काय आहे विशेषता
- मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
- स्टेडियममध्ये तब्बल ७६ वातानुकूलीन कॉरपोरेट बॉक्स तयार करण्यात आले आहेत.
- मोटेरा स्टेडियम ६३ एकरात उभारण्यात आला आहे.
- स्टेडियममध्ये ११ खेळपट्ट्या आहेत.
- स्टेडियममधील खेळपट्ट्या लाल आणि काळ्या मातीने तयार करण्यात आल्या आहेत.
- खेळाडूंसाठी खास वेगळे ड्रेसिंग रुम तयार करण्यात आले आहे. याला जोडूनच जिम देखील आहे.
- मोटेरा स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रुम आहेत.
- इनडोर आणि आऊटडोर सरावाची सुविधा या स्टेडियममध्ये आहे.
- स्टेडियममध्ये एलईडी फ्लडलाइट लावण्यात आले आहेत. यामुळे उंचावरील चेंडूवर खेळाडूला नजर ठेवणे सोपे जाणार आहे.
हेही वाचा -IND vs ENG: फिटनेस टेस्ट पास; उमेश यादवचा भारतीय संघात परतला
हेही वाचा -IPL २०२१ : लिलाव संपल्यानंतर दोन मिनिटांनी विराटने केला 'या' खेळाडूला मॅसेज