पुणे - भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये झालेला पहिला सामना भारताने ६६ धावांनी जिंकला. भारताच्या विजयात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने मोलाची भूमिका निभावली. त्याने या सामन्यात ४ गडी बाद केले. या कामगिरीसह तो भारताकडून एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात सर्वश्रेष्ठ गोलंदाजी करणारा खेळाडू ठरला आहे.
प्रसिद्ध कृष्णाने पदार्पणाच्या सामन्यात ८.१ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ५४ धावा देत ४ गडी बाद केले. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्ज आणि टॉम कुरेन यांची विकेट घेतली.
प्रसिद्ध पदार्पणाच्या सामन्यात चार गडी बाद करणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारताने पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना १९७४ साली खेळला होता. आतापर्यंत एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात भारताच्या एकही गोलंदाजाला ४ गडी बाद करता आलेले नव्हते. नोएल डेविडने भारताकडून पदार्पणाचा सामना खेळताना १९९७ साली २१ धावांत ३ गडी बाद केले होते. त्याने हा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता.