दुबई -आयसीसीने निवडलेल्या महिला टी-२० विश्वकरंडक संघात केवळ एका भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळाले आहे. भारताची फिरकीपटू पूनम यादवला आयसीसीच्या संघात जागा मिळाली असून सलामीवीर फलंदाज शफाली वर्माची १२ वी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
हेही वाचा -पूजा रानी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
पूनमने या स्पर्धेत ११.९० च्या सरासरीने १० बळी घेतले. तर, शफाली वर्माने १५८.२५ च्या स्ट्राइक रेटने १६३ धावा केल्या आहेत. या संघात पाच वेळा जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक पाच खेळाडू दाखल झाले आहेत. एलिसा हेली, बर्थ मुनी, मेग लेनिंग, जेस जोनासेन आणि मेगन स्कूट यांना या संघात स्थान मिळाले आहे.
याव्यतिरिक्त, नॅट स्कीव्हर, हीदर नाइट, सोफी एसलेस्टन, अन्या श्रुबसोल या इंग्लंडच्या चार खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. लॉरा वूल्वारडर्ट ही दक्षिण आफ्रिकेची एकमेव खेळाडू संघात आहे.
जागतिक महिला दिनी रंगलेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताचा ८५ धावांनी धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाचवे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीने नाबाद अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.