मेलबर्न- ऑस्ट्रेलियात बुश फायर रिलीफ फंडसाठी झालेल्या सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने अॅडम गिलख्रिस्टच्या संघावर एक धावाने विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गिलख्रिस्टच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पाँटिंगच्या संघाने १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या होत्या. विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गिलख्रिस्ट संघाला १० षटकात ६ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता आली.
पाँटिंग संघाकडून खेळताना वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. तर कर्णधार पाँटिगने नाबाद २६ धावा आणि मॅथ्यू हेडनने १६ धावा केल्या. गिलख्रिस्ट संघाकडून शेन वॉटसनने ३० धावा केल्या. त्याने ९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावले. सायमंड्सने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहला ६ चेंडूत २ धावा करता आल्या.