सेंट जॉन (एंटीगुआ) - वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार केरॉन पोलार्डने एका षटकामध्ये सहा षटकार ठोकत युवराज सिंह, हर्षल गिब्स यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने ४ गडी राखून विजय मिळवला. यात पोलार्डने कर्णधाराला साजेशी खेळी केली. या खेळीत त्याने श्रीलंकेच्या अकीला धनंजय याच्या एका षटकामध्ये सहा षटकार लगावले. पोलार्डच्या आधी युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने सहा चेंडूत सहा उत्तुंग षटकार लगावले आणि युवराज सिंहच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबरी केली. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबरी करण्यात यश मिळाले आहे.
पोलार्ड सहा चेंडूत सहा षटकार लगावणारा क्रिकेटच्या इतिहासात तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये नेदरलँडच्या डान वैन बुंगेच्या गोलंदाजीवर एकाच षटकात सहा षटकार लगावले होते. याशिवाय युवराज सिंहने २००७ च्या आयसीसी टी-२० विश्वकरंडकात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावले होते.