मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभरात रविवारी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्याचबरोबर सध्याच्या कठीण परिस्थितीत जी लोकं अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांचे कौतुक करण्यासाठी घराबाहेर येऊन टाळ्या वाजवणे किंवा घंटानाद करण्यास सांगितलं होतं. मोदींच्या या आवाहनाला चेन्नई सुपर किंग्ज संघानेही प्रतिसाद दिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग आणि केदार जाधव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात धोनी-हरभजन-केदार डान्स करत टाळ्या वाजवताना दिसून येत आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे सध्या देशात गंभीर वातावरण आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. सर्व महत्वाच्या शहरांमध्ये टेस्ट लॅब वाढवण्याला सुरुवात झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांनी महत्वाची शहरे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.