ब्रिस्बेन - भारतीय संघाचा मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूरने कसोटीमधील आपली पहिली धाव षटकाराने काढली. असा करणारा शार्दुल दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने हा कारनामा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाचे ६ गडी तिसऱ्या दिवसाच्या, दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला बाद झाले. तेव्हा शार्दुल ठाकूर मैदानात आला.
दबाव असताना शार्दुलने खणखणीत षटकार लगावत कसोटीत आपले धावांचे खाते उघडले. विशेष म्हणजे, शार्दुलने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या पॅट कमिन्सला षटकार ठोकला. असा पराक्रम करणारा शार्दुल दुसरा भारतीय तर १३ जागतिक खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतने २०१८ मध्ये इंग्लंडविरोधात आदिल रशिदला षटकार लगावत आपले धावाचे खाते उघडले होते.
कसोटीत षटकाराने धावांचे खाते उघडणारे फलंदाज –
- एरिक फ्रीमैन (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध भारत, १९६८
- कार्लिसल बेस्ट (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, १९८६
- कीथ दबेंगवा (झिम्बाब्वे) ) विरुद्ध न्यूजीलंड, २००५
- डेल रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) विरुद्ध बांग्लादेश, २००९
- शफीउल इस्लाम (बांग्लादेश) विरुद्ध भारत, २०१०
- जहुरुल इस्लाम (बांग्लादेश) विरुद्ध इंग्लंड, २०१०
- अल अमीन हुसैन (बांग्लादेश) विरुद्ध न्यूजीलंड, २०१३
- मार्क क्रेग (न्यूजीलंड) विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१४
- धनंजया डी सिल्वा (श्रीलंका) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१६
- कमरुल इस्लाम रब्बी (बांग्लादेश) विरुद्ध इंग्लंड, २०१६
- सुनील अम्बरीस (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूजीलंड, २०१७
- ऋषभ पंत (भारत) विरुद्ध इंग्लंड, २०१८
- शार्दुल ठाकुर (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२१