नवी दिल्ली - सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेत भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याने एक अप्रतिम झेल घेतला. त्या झेलचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. शुक्रवारी झालेल्या गोवा विरुध्द बडोदा सामन्यात युसूफने हवेत सूर मारत अप्रतिम झेल टिपला. यानंतर आयपीएलमधील युसूफचा सहकारी खेळाडू राशिद खान याने अतिशय मजेदार पद्धतीने त्याचे कौतुक केले आहे.
गोवा-बडोदा सामन्यातील १९ षटकांच्या ५ व्या चेंडूवर युसूफने गोवा संघाचा कर्णधार दर्शन मिसाळ याला माघारी पाठवण्यासाठी हा झेल पकडला. तेव्हा युसूफचा भाऊ इरफान पठाणने, झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना इरफानने तो पक्षी आहे का ? नाही हा युसूफ पठाण आहे... चांगला कॅच पकडला लाला. प्री हंगामातील सर्व तुमची परिश्रम फेडले. असे मजेशीर कॅप्शनही सोबत लिहिले आहे.
इरफानच्या या ट्विटवर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खानने मजेशीर कमेंट केली आहे. तो म्हणतो, ' खूप भारी झेल घेतलास भाऊ, हे पठाणचे हात आहे ठाकूर.' राशिद या कमेंटवर इरफानने सही सांगितलंस पठाणांच्या हातात जादू आहे अशी प्रतिक्रिया दिली.