कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. मलिक टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला आशियाई आणि तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे.
शनिवारी पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत मलिकने रावळपिंडीमध्ये खैबर पख्तूनख्वासाठी ७४ धावा करत हा टप्पा ओलांडला. मलिकची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएबसाठी एक खास ट्विट केले आहे. "दीर्घायुष्य, संयम, परिश्रम, बलिदान आणि विश्वास शोएब मलिक, मला तुझा अभिमान आहे", असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.