नवी दिल्ली - पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफानने, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर विषयी गौप्यस्फोट केला आहे. सध्य स्थितीत संघाबाहेर असणाऱ्या इरफानने, गंभीरची कारकीर्द मी संपवली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या उंचापुरा गोलंदाज मोहम्मद इरफानविरोधात खेळताना गौतम नेहमी चाचपडताना दिसला आहे.
गौतम गंभीरने क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती स्वीकारत राजकारणाच्या मैदानात पदार्पण केले आहे. गंभीरने २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवून खासदार बनला आहे. क्रिकेटच्या मैदानात गंभीरने सलामीवीराच्या भूमिकेत विरोधी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. मात्र, आता इरफानने गंभीरचे करियर संपल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना इरफान म्हणाला, 'मी ज्यावेळी २०१२ मध्ये भारताविरुद्ध खेळत होतो. तेव्हा, गंभीर माझी गोलंदाजी सहजपणे खेळू शकला नाही. माझ्या उंचीमुळे फलंदाजांना चेंडू नेमका कुठून येतोय हे समजणे कठीण जात होते. गौतम गंभीरला मी या मालिकेत ४ वेळा बाद केले. तो माझ्या नजरेला नजर देणेही टाळायचा, असे मला वाटते.'