लाहोर -कोरोनाची चाचणी झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) इंग्लंडला जाणाऱ्या 20 खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. पीसीबीने ट्विटरवरुन ही नावे दिली. पाकिस्तानला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
कसोटी संघाचे नेतृत्व अझर अलीकडे देण्यात आले आहे. तर, बाबर आझम संघाचा उप-कर्णधार असेल. तत्पूर्वी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) रविवारी पाकिस्तान संघाच्या आगमनची पुष्टी केली होती. परंतु, मालिकेच्या तारखेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ही मालिका प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल.
ईसीबीने म्हटले आहे, की पाकिस्तान संघ 14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर डर्बीशायरला जाईल आणि 13 जुलैला इनकोरा काऊंटी मैदानावर तयारी सुरू करेल. येथे हा संघ दोन सराव सामने खेळणार आहे. दौरा सुरू करण्यापूर्वी, सर्व लोकांची प्रवासापूर्वी चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
पाकिस्तान संघ -अझर अली (कर्णधार), बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इप्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शेनवारी आणि यासिर शाह.