कराची - पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजची कोरोना चाचणी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळली आहे. यापूर्वी, हाफिजने केलेल्या वैयक्तिक चाचणीत तो निगेटिव्ह आढळला होता.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी, पाकिस्तानच्या खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये हाफिजचा समावेश असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले होते. त्यानंतर, हाफिजने स्वत: आणि त्याच्या कुटूंबासाठी वैयक्तिकरित्या चाचणी केली. त्यात तो निगेटिव्ह आढळला.
आता त्याची पुन्हा चाचणी झाली असून तो या चाचणीत पॉझिटिव्ह सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्यावर विभाजन प्रोटोकॉल तोडल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार करत आहे.
हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, पाकिस्तानच्या आणखी सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. या खेळाडूंमध्ये फखर जमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तान 3 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 सदस्यांचा संघ निवडण्यात आला होता.