कराची- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने, श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय मिळवत २-० ने मालिका जिंकली. मोहम्मद आमिरने ३ गडी बाद करत श्रीलंकेच्या फलंदाजांना वेसण घातली. तर फखर झमानने ७६, आबिद अलीने ७४ आणि हॅरिस सोहेलने ५६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ५ बाद २९७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिर याने ५० धावा देत ३ गडी बाद केले. लंकेचे २९८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरूवात चांगली झाली.
हेही वाचा - श्रीलंकेच्या संघासाठी पाकने लावला 'कर्फ्यू', गंभीरने व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली
सलामीवीर अबिद अली आणि फखर झमान या जोडीने १२३ धावांची सलामी दिली. अबिद अली ७४ धावांवर बाद झाला. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी करणारा बाबर आझम मैदानात उतरला. तो व्यक्तिगत ३१ धावा काढून बाद झाला. बाबर पाठोपाठ झमानही ७६ धावा काढून बाद झाला.
तेव्हा कर्णधार हॅरिस सोहेल आणि कर्णधार सर्फराज अहमद या जोडीने पाकला विजया जवळ नेले. सरफराज बाद झाल्यानंतर, विजयापासून काही धावा बाकी असताना, हॅरिस सोहेल ५६ धावांवर बाद झाला. इफ्तिखार अहेमद आणि वहाब रियाज यांनी पाकच्या विजयावर शिकामोर्तब केले.
पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकत मालिकेत २-० ने बाजी मारली. सामनावीराचा पुरस्कार अबिद अली तर मालिकावीराचा पुरस्कार बाबर आझमला प्रदान करण्यात आला.
हेही वाचा -कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा; १, २, ३ कोण आहेत वाचा...