बेनोनी -आयसीसी अंडर-१९ विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला सहा विकेट्सनी पराभूत केले. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना भारताशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ४ फेब्रुवारीला हा सामना पार पडणार आहे.
हेही वाचा -‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा अफगाणिस्तानचा संघ १९८ धावांवर ढेपाळला. पाकिस्तानने हे आव्हान सहा गडी राखून सहज पूर्ण केले. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद हुरैराने ७६ चेंडूत ६४ तर, हैदल अलीने ६१ धावा केल्या.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फरहान जाखीलने सर्वाधिक ४० धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर खानला तीन बळी मिळाले. फहादने दोन तर, ताहिर हुसेन, अब्बास आफ्रिदी, आमिर अली, अक्रम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद १५९ धावा करू शकला.