लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी इंग्लंड-पाकिस्तान दौर्याच्या ताज्या वेळापत्रकांना दुजोरा दिला. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
उभय संघातील पहिला कसोटी सामना 5 ते 9 ऑगस्टदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येईल. तर, दुसरा कसोटी सामना 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाईल. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना साऊथम्प्टनच्या एजेस बाउल येथे खेळवला जाईल.
या मालिकेनंतर, दोन्ही संघात टी-20 मालिका पार पडणार आहे. हे तीन सामने 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरदरम्यान खेळवण्यात येतील.
29 जूनपासून पाकिस्तानचा संघ वॉरसेस्टरशायर येथे 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. 13 जुलैला हा संघ डर्बीशायरला आणि त्यानंतर 1 ऑगस्टला मँचेस्टरला जाईल.
तत्पूर्वी, इंग्लंडला वेस्ट इंडिजबरोबर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघात हे सामने विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत.