कराची - पाकिस्तानच्या पहिल्या चार फलंदाजांनी, भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचे अव्वल चार फलंदाजांनी शतक ठोकलं. यापूर्वी असा कारनामा फक्त भारतीय संघाला करता आला होता.
कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने आपला दुसरा डाव ४७५ धावांवर घोषित केला. या सामन्यात पाकिस्तानकडून शान मसूद (१३५), आबिद अली (१७४), अझहर अली (११८) आणि बाबर आझम (१००) यांनी शतक झळकावलं.
यापूर्वी असा कारनामा, भारतीय संघाने १२ वर्षापूर्वी केला होता. २००७ मध्ये भारताच्या चार फलंदाजांनी बांग्लादेशविरुद्ध खेळताना चार शतकं झळकावली होती. ढाका येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताकडून दिनेश कार्तिक (१२९), वसीम जाफर (१३९), राहुल द्रविड (१२९) आणि सचिन तेंडुलकर (१२२) यांनी शतक झळकावलं होतं.