कराची -भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचे अनेक चाहते निराश झाले. आपला आवडता खेळाडू यापुढे निळ्या जर्सीत दिसणार नसल्याने अनेकांना आपले दु: ख पचवणे कठीण गेले. पाकिस्तानमध्येही धोनीला चाहत्यांची कमी नाही. अशाच एका पाक चाहत्याने धोनीच्या निवृत्तीनंतर, यापुढे भारत-पाकिस्तान संघांमधील आंतराष्ट्रीय सामने न पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
कराचीत जन्मलेले मोहम्मद बशीर बोजई उर्फ 'चाचा शिकागो' यांना धोनीच्या निवृत्तीने दुः ख झाले आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात चाचा शिकागो नेहमी उपस्थिती नोंदवतात. धोनीच्या फोटोंनी भरलेले कपडे घातल्यामुळे ते जगात कट्टर धोनीप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानचे असूनही धोनीला समर्थन देत असल्याने त्यांना पाक चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
धोनीच्या निवृत्तीनंतर ते म्हणाले, ''धोनी निवृत्त झाला आहे आणि म्हणून मी आता क्रिकेटसाठी परदेशात जाणार नाही. मी त्याच्यावर प्रेम केले आणि त्यानेही मला तितकेच प्रेम दिले. सर्व महान खेळाडूंना एक दिवस खेळ सोडावा लागतो. पण त्याच्या निवृत्तीमुळे मला खूप वाईट वाटले. धोनी एक भव्य निरोप घेण्यास पात्र आहे. पण तो या सर्वांच्या पलीकडे आहे. मी धोनीसोबत थोडा वेळ घालवला. पण, २०१९मध्ये मी त्याच्यासोबत जास्त बोलू शकलो नाही. नेहमीप्रमाणे त्याने माझ्यासाठी एका तिकिटाची व्यवस्था केली.''
चाचा शिकागो पुढे म्हणाले, ''२०१८च्या आशिया चषकादरम्यान त्याने मला त्याच्या रूममध्ये नेले आणि मला त्याची जर्सी दिली. हे खरंच विशेष होते. जेव्हा माझ्याकडे पोहोचण्यासाठी वेळ नव्हता तेव्हा त्याने त्याच्या एका कर्मचार्याला तिकिटासह पाठवले. त्याला असे काही करण्याची गरज नव्हती. परंतु त्याने ते केले."