नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या नावे एका 'नकोसा' विक्रमाची नोंद झाली आहे. शाहीदने शून्यावर बाद होण्याचे शतक पूर्ण केलं आहे. सध्या शाहीद बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत राजशाही रॉयल्स संघाविरुद्ध तो शून्यावर बाद झाला.
पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाहीद आफ्रिदी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमध्ये मिळून तब्बल १०० वेळा शून्यावर बाद झाला आहे. ही आकडेवारी पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. त्या आकडेवारीनुसार, आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. लाला या टोपण नावाने परिचित असलेल्या आफ्रिदीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०, कसोटीत ६ तर टी-२० मध्ये ८ वेळा भोपळा फोडता आलेला नाही. तर लीग क्रिकेटमध्ये आफ्रिदी ५६ वेळा शून्यावर बाद झाला.