मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला उद्यापासून (ता. २१ फेब्रवारी) सुरुवात होत आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होत स्वत:ला तयार करत आहेत. दरम्यान, आयसीसीने आणि वर्ल्डकपने पाकिस्तान महिला संघाचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. यात पाकिस्तानी महिला खेळाडू तोंडाने आवाज करत डान्स करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या चाहत्यांना आवडला नसून यावर त्यांनी त्या खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानच्या त्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे.
आयसीसी आणि 'वर्ल्डकप'ने शेअर केलेल्या व्हिडिओत पाकिस्तान संघातील अष्ठपैलू इरम जावेद बॅट हातात पकडून तोंडाने आवाज करत आहे आणि अन्य सहकारी डान्स करत आहेत. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानी महिला संघ खरोखर रॉकस्टार आहे, असे म्हटले आहे.
पाकच्या एका चाहत्याने ही डान्स पार्टी आहे की आयसीसी स्पर्धा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुलींनो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका चाहत्याने या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठीच्या चियरलिडर्स म्हटले आहे. तर अन्य एकाने किमान थोडी क्रिकेट कसे खेळायचे शिकला असता. बाकी सर्व कामात एक्सपर्ट आहेत या, असा टोला लगावला आहे.