लाहोर -आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे दहा क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, पीसीबीचे सीईओ वसीम खान यांनी आपले मत दिले.
खान म्हणाले, ''पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये तंदुरूस्त असणाऱ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. म्हणूनच या व्हायरसचा अंदाज घेतला जाऊ शकतो. फेडरल आणि प्रांतीय सरकारांनी केलेल्या सर्व सुरक्षा अटींचे काटेकोरपणे पालन करण्याची मी लोकांना विनंती करतो."
खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याबद्दल ते म्हणाले, "जोपर्यंत खेळाडूंचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून त्यांना मदत करू. शक्य तितक्या लवकर त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली तर आम्ही त्यांना इंग्लंडला येण्यास परवागी देऊ. आम्ही त्यांना स्वत:ला अलिप्त राहण्याचा सल्ला दिला आहे.''
इंग्लंड दौऱ्याबाबत खान म्हणाले, "इंग्लंड दौरा योग्य मार्गावर आहे आणि टीम येत्या 28 जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार रवाना होईल. रिझवान अहमद नेगेटिव्ह आढळला आहे. याचा अर्थ आहे की तो त्वरित प्रशिक्षण आणि सराव सुरू करू शकेल."
हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, पाकिस्तानच्या आणखी सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. या खेळाडूंमध्ये फखर जमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज या खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.